१० मे २०२३ रोजी नाम फाउंडेशन मार्फत महाबळेश्वर/जावली तालुक्यांत झालेल्या शेतीची कामे पाहण्यासाठी सिनेसुपरस्टार आदरणिय, पद्मश्री श्री. नाना पाटेकरसाहेब तळदेव येथे आले होते. त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी या विभागाच्या विकासाला सामुदायिक शेतीशिवाय पर्याय नाही असे वारंवार नमुद केले. नाम फाउंडेशनच्या कार्यात स्वराज्य फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची मेहनत व संपुर्ण नियोजन होते. त्याचबरोबर तळदेव येथील कार्यक्रमाचे नियोजनही स्वराज्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीने झाले व कार्यक्रम यशस्वी झाला.त्यामुळे विभागाच्या विकासासाठी आदरणिय नाना पाटेकरांचे सामुदायिक शेतीचे आव्हान स्वराज्य फाउंडेशनने उचलले व त्यातुनच साकार झाला वलवण येथे ८ एकरमध्ये सामुदायिक शेती हळद प्रकल्प !
१० टन सेलम या जातीच्या हळद बियाण्याची लागवड जुन महिन्यात ग्रामस्थांच्या मेहनतीतून पार पडली व त्यांना त्यातुन रोजगारही मिळाला. इतकेच नाही तर याहीपुढे बेनणी, खुरपणी, खत देणे, पाणी देणे व पीक काढणी या माध्यमांतुनही त्यांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश हा नानाजींचा अनुभव अमलात आणने व यातुन शेतक-यांना एका नविन पिकाची ओळख व त्यातुन फायदे पटवुन देणे हा आहे. जेणेकरून भविष्यात आपला शेतकरी या पिकाकडे वळेल व त्याची आर्थिक स्थिती सुधारेल.
स्वराज्य फाउंडेशन इतक्यावरच न थांबता हळद प्रोसेसिंग युनिट प्रस्थापित करणार असुन भविष्यात शेतक-यांना बाजारपेठही उपलब्ध करुन देणार आहे. या प्रकल्पासाठी मनामध्ये चेतना निर्माण करणारे नानाजींचे बोल प्रकर्षाने फलश्रूत झाले असे आम्हाला या प्रकल्पासंदर्भात वाटते. आदरणिय, सन्माननिय पद्मश्री, श्री. नाना पाटेकरसाहेब आपले शतशः धन्यवाद !